३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:47 PM2024-10-30T15:47:05+5:302024-10-30T15:47:31+5:30
दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे आमदार आमचेच निवडून येणार
वडीगोद्री : दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे उमेदवार आमचेच असतील. यामुळे शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला आमदार झालेले दिसतील, असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. लोकसभेला जसा जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीलादेखील किंगमेकरची भूमिका तुमची राहणार का ? या प्रश्नावर जरांगे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
येत्या ३० तारखेला होणारी अंतिम बैठक ही ३१ तारखेला होणार आहे. एकप्रकारे ते चांगले झाले आहे. ३० तारखेला छाननी आहे. कोणाचे अर्ज बाद होतात, कोणाची राहतात हे कळेल. उमेदवारीविषयी अधिकृत बैठक ही ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीला मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध भिक्खू येणार आहेत, असे जरांगे यांनी सांगितले. ३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ हे अंतिम करणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
चूक केलेली मान्य करायची नाही, ही देवेंद्र फडणवीसांची वृत्ती आहे. त्यांना आम्हाला बोलायची गरजच काय? आम्ही त्यांना सांगितले होते. गोरगरीब मराठा समाजास आरक्षणाची खूप गरज आहे. यामुळे मराठा समाजाचा त्यांच्याविषयी रोष निर्माण झालेला आहे, अशी टीका जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
सगळेच राजकारणी एका माळेचे मणी
हे राजकारणी सत्ता स्थापन करायची असेल तर लगेच लोह चुंबकासारखे एकमेकांना येऊन चिकटतात. सगळेच राजकारणी एका माळेचे मणी आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी महायुती व महाविकास आघाडीवर केली. आता सत्तेत हे दोन्ही पक्ष नकोत, अशी लोकांची भूमिका आहे. यांच्यापेक्षा आम्हाला दगड, गोटा दिला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ. मात्र, हे महायुती आणि महाविकास आघाडी नकोय, असे मनोज जरांगे म्हणाले.