उमेदवारांची धाकधूक वाढली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:42+5:302021-01-17T04:26:42+5:30
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेड्यासह चिंचोली व जवखेडा ठोंबरे ग्रामपंचायत निवडणुकीमधील उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यात ...
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेड्यासह चिंचोली व जवखेडा ठोंबरे ग्रामपंचायत निवडणुकीमधील उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यात विजय आणि पराजय कोणाचा होतो? यावर सध्या गावात आकडेमोड सुरू आहे. शिवाय उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे.
केदारखेडा ग्रामपंचायतीसाठी ११ सदस्य, चिंचोली ग्रामपंचायत ११, तर जवखेडा ठोंबरे येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. याचा निकाल उद्या, सोमवारी लागणार आहे. परंतु, या मतदान प्रक्रियात कोण आपल्या बाजूने? कोण विरोधात याची चाचपणी उमेदवार मंडळी करताना दिसत आहे.
ग्रामस्थांच्या मनातील सदस्य कोण हे १८ जानेवारीला समोर येणार आहे. असे असले तरी ‘माझा विजय नक्कीच आहे’. ‘पण... लिड किती’? यासाठी मतांची आकडेमोड सुरू असल्याचे ग्रामपंचायत उमेदवार सांगत आहेत. मतदान काळात काही मतदारांनी अनेक मजेदार किस्सेदेखील केले आहेत. त्यामुळे मतदार राजाच्या मतांची बेरीज-वजाबाकी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत.
केदारखेडा येथे नवख्या विरुद्ध प्रस्थापितांची लढाई तालुक्यात चर्चेला गेली आहे. कारण, नवख्या पॅनेलप्रमुखांनी चांगलीच फळी उभी करून निवडणूक विकासाची बाजू घेऊन लढविली आहे. यांना शह देण्यासाठी सर्व प्रस्थापित एकवटले होते.