ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:24 PM2022-09-05T12:24:55+5:302022-09-05T12:25:25+5:30
कामगार ऊसतोडीसाठी गेला परंतु ऊसतोडी न करता परत गावाकडे आला.
जालना : झालेल्या करारानुसार कामगाराने ऊसतोडी केली नाही, तसेच मुकादमाकडून घेतलेले पैसे परत न केल्यामुळे एका ऊसतोड कामगाराचे पाच जणांनी अपरहण केल्याची घटना अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर शनिवारी दुपारी घडली. संतोष निवृत्ती मगरे (रा. चिंचखेड, ता. अंबड, ह.मु. पुणे) असे अपहरण झालेल्या कामगाराचे नाव आहे, अशी माहिती सपोनि. इंगळे यांनी दिली.
संशयित मुकादम देवीदास राठोड, विकास पवार, विनोद राठोड, (सर्व रा. पिंपरखेड), पंडित शेषराव चव्हाण, गणेश शिवदास राठोड (रा. राहुवाडी, ता. अंबड) यांनी संतोष मगरे यांना ऊसतोडीसाठी आगाऊ पैसे दिले होते. त्यानुसार ते पुणे येथे ऊसतोडीसाठी गेले; परंतु ऊसतोडी न करता ते परत गावाकडे आले. त्यांना देवीदास राठोड यांनी वारंवार पैशांची मागणी केली; परंतु ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे पाचही संशयित संतोष मगरे यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण करीत होते. शनिवारी दुपारी मगरे हे अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर चहा पीत होते.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचही संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर मगरे यांना क्रूझर गाडीत बसून घेऊन गेले. याची माहिती नातेवाइकांनी अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, याप्रकरणी निवृत्ती हरिभाऊ मगरे यांच्या फिर्यादीवरून पाचही संशयितांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.