किनगाव चारा छावणी की जनावरांची छळ छावणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:02 AM2019-05-21T01:02:32+5:302019-05-21T01:03:28+5:30
बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली
रवी गात ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असुन या चारा छावणीत चाराच नसल्याने शेतकरी व मुक्या जनावरांची क्रूर थट्टा करणा-या बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी किसान सभा व परिसरातील शेतक-यांनी केली आहे.
चारा छावणीच्या अव्यवस्थेचा गैरफायदा घेत काही शेतक-यांनी शनिवारी चारा पळवून नेल्याच्या मुद्यांचा बाऊ करत बाजार समिती सरसकट सर्वच शेतक-यांना वेठीस धरत आहे. मुक्या जनावरांचा छळ करत असल्याचा आरोपही शेतक-यांनी केला आहे. तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अंबड बाजार समितीच्या वतीने शुक्रवारी किनगाव शिवारात शासकीय अनुदानित चारा छावणी सुरु करण्यात आली. मात्र चारा छावणीत चारा व सावलीची व्यवस्था नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रतिनिधीने सोमवारी चारा छावणीला भेट दिली असता चारा छावणीत असलेले किनगाव येथील कल्याण चौधरी, साईनाथ चौधरी, बळीराम गायकवाड, कैलास बोंबले, जामखेड येथील नारायण भोजने, जोगेश्वरवाडी येथील मांगीलाल जाधव, किनगाववाडी येथील एस. एस. बिन्नीवाले, रोहिलागड येथील धोंडिबा टकले, शिवाजी टकले, विठ्ठल खरात, हरी टकले या शेतक-यांची भेट झाली.