दूध संकलन केंद्राची क्षमता ५० हजार लिटरने वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:36 AM2018-09-07T00:36:16+5:302018-09-07T00:36:35+5:30
जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुरूवारी लोकमतमध्ये ‘दुधाचा महापूर’ ही बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या बातमीची दखल तातडीने घेतली असून, जालना येथील दूध संकलन केंद्रात सध्या केवळ १० हजार लिटर दूध संकलित केले जाते. आणि या केंद्रावर चक्क ६० हजार लिटर दूध आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या संदर्भात खोतकर यांनी तातडीने दुग्ध विकास विभागाशी संपर्क साधून जालन्याचा दूध संकलनाचा वाढीव क्षमतेचा प्रस्ताव हा किमान ५० हजार लिटर करण्याच्या सूचना दिल्याचे खोतकर म्हणाले.
हे जरी खरे असले तरी, शुक्रवारी देखील या दूध संकलन केंद्रावर अतिरिक्त दूध संकलन झाल्याने प्रश्न कायम होता. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना ते संकलन केंद्राची क्षमता पाहूनच दूध खरेदी करावे अशा सूचना संकलन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र अतिरक्त दूध शेतक-यांनी कुठे न्यावे हा प्रश्न अनुत्तरित असल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.