कारची दुचाकीला धडक; तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:44+5:302020-12-31T04:30:44+5:30
पुतळी फाटा येथील घटना; एकजण गंभीर जखमी विरेगाव : मंठ्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची ...
पुतळी फाटा येथील घटना; एकजण गंभीर जखमी
विरेगाव : मंठ्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुतळी फाटा येथे जालना-मंठा महामार्गावर घडली. या अपघातात महादेव आसाराम काकडे (२६, रा. चितळी, ता. जालना) हा जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
मंठ्याहून स्विफ्ट डिझायर (एमएच ०५ एजे ८०७७) भरधाव वेगाने जालन्याकडे येत होती. पुतळी फाटा येथे महादेव काकडे व मनोहर अर्जुन कसाब (१२) हे दुचाकीने (एमएच २१ बीएन ५०२१) रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायरने जोराची धडक दिली. या अपघातात महादेव जागीच ठार झाला. तर मनोहर कसाब हा गंभीर जखमी झाला. मनोहरला जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी औरंगाबाद येथे रेफर केले. त्याच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय रत्नदीप बिराजदार यांच्या मार्गदर्शनात हेडकॉस्टेबर संजय राऊत करीत आहेत.
महादेव काकडे याला गुरुवारी पाहुणे पाहायला येणार होते; परंतु काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजाई असा मोठा परिवार आहे.