पिस्तुलाचा धाक दाखवून कार लंपास; पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 01:09 PM2021-05-31T13:09:54+5:302021-05-31T13:12:28+5:30
कुंभार पिंपळगाव येथील अंबड- पाथरी मार्गावर चोरीच्या कारसह संशयित आरोपी बद्रीनाथ प्रभाकर घुगे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
कुंभार पिंपळगाव, आष्टी (जि. जालना) : पिस्तूलचा धाक दाखवून मोबाइल व कार पळविल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील हास्तूर तांडा पाटीजवळ घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी दोन तासांत छडा लावला असून, एकास अटक केली आहे.
बद्रीनाथ प्रभाकर घुगे (वय २३, रा. टाके ढोणगाव, ता. अंबड), असे संशयित आरोपीचे नाव आहे. आष्टी येथील बळीराम टेकाळे हे रविवारी दुपारी चारचाकीने सेलू (ता. परभणी) येथून आष्टीकडे येत होते. सेलू ते आष्टी रोडवरील हास्तूर तांडा पाटीवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी थांबविली. गाडीचा दरवाजा उघडून एकाने डोक्याला पिस्तूल लावून मोबाइल व पाकीट घेऊन टेकाळे यांना उतरून दिले. त्यानंतर एक जण कार घेऊन, तर दोघे हे दुचाकीवरून फरार झाले. आष्टी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली. शिवाय, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, अंबड, माजलगाव येथील पोलिसांना अवगत केले.
कुंभार पिंपळगाव येथील अंबड- पाथरी मार्गावर चोरीच्या कारसह संशयित आरोपी बद्रीनाथ प्रभाकर घुगे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून चारचाकी, एक पिस्तूल, पाकीट व मोबाइल जप्त करण्यात आला आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. सुभाष सानप, पोकाॅ. अमोल तिबुले, पोकाॅ. सूरज चरावंडे, पोउपनि. शिवशिंग बहुरे, पोहेकाॅ. भागवत हिरचंद्रे आदींनी केली आहे.