कोणतीही भीती न बाळगता काळजीपूर्वक कामे पार पाडा- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:10 AM2019-04-08T00:10:38+5:302019-04-08T00:11:14+5:30
ठल्याही प्रकारची भिती न बाळगता निवडणुकीची कामे काळजीपूर्वक पार पडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता निवडणुकीची कामे काळजीपूर्वक पार पडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतूर येथे रविवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन सिलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचा-यांना या सूचना दिल्या.
पुढे बोलताना बिनवडे म्हणाले की, या सर्व लहान- सहान बाबी लक्षात घेवून तुम्हाला प्रत्यक्षात १८ तारखेला काम करायचे आहे. दिलेले सर्व साहित्य काळजीपूर्वक हाताळा. तुम्हाला जे साहित्य दिले जाणार आहे, त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. प्रत्येक कामे वेळच्या वेळी पार पाडा. शेवटी रांगेतील लोकांना टोकन देवून शेवटच्या माणसाचे मतदान करून घ्या. घाई करून नका. यातून काही चूक झाल्यास होणा-या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी ब्रिजेश पाटील, संजय डवले, राजेभाऊ कदम, सुमन मोरे, नायब तहसीलदार विजय दावणगावकर, धनश्री भालचीम, अनिल शिंगाडे, कृष्णा परांडे, अशोक टाकरस, ंसंजय कास्तोडेसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी ज्या गावात तुम्ही केंद्रावर कर्तव्याला असाल, त्या गावात आपले नातेवाईक असतील तर त्यांच्याकडे जाणे कटाक्षाने टाळावे. असे प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.