जालन्यात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:21+5:302021-05-31T04:22:21+5:30
शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी जालना : पावसाळा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जालना शहरात अद्याप नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व ...
शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी
जालना : पावसाळा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जालना शहरात अद्याप नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. पावसाळ्यात साथरोग पसरून परिस्थिती गंभीर होऊ नये, याची खबरदारी म्हणून मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्त्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन मान्सूनपूर्व कामाबाबत सविस्तर लेखी निवेदन दिले. यावेळी शहर प्रमुख डॉ. आत्मानंद भक्त, नगरसेवक विजय पवार, गोपीकिशन गोगडे, संदीप नाईकवाडे, रामनाथ भुतेकर, आयुष राठोड, पांडुरंग खैरे यांची उपस्थिती होती.
मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना दिलेल्या लेखी निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे की, कोविड संसर्गाची दुसरी लाट शहरात वेगाने फोफावली, अद्याप संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला नसला तरी तोंडावर येऊन ठेपलेल्या मान्सूनमुळे अधून-मधून अवकाळी पाऊस पडत आहे. परिणामी काही ठिकाणी स्वच्छतेची कामे न झाल्याने घाण, कचरा व नालीचे पाणी रस्त्यावर येताना दिसत आहे. नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांसाठी ५४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असताना पालिका मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना केव्हा सुरुवात करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवेदनावर गटनेते विष्णू पाचफुले, शहरप्रमुख डॉ. आत्मानंद भक्त, रावसाहेब राऊत, विजय पवार, संदीप नाईकवाडे, रंजना गोगडे, निखिल पगारे, किशोर पांगारकर, उषा पवार, मीना घुगे, वैशाली जांगडे यांची नावे आहेत.
_________________