धुलीवंदनाच्या दिवशी अनेकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:30 AM2019-03-23T00:30:30+5:302019-03-23T00:30:45+5:30
दारु पिऊन मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्यांविरुध्द चार जणांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / शहागड : दारु पिऊन मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्यांविरुध्द चार जणांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर शिवदास पवार, ज्ञानेश्वर अंगद पवार, जितु (पूर्ण नाव समजू शकले नाही), व एक अनोळखी (सर्व रा. रामगव्हाण ता. अंबड) अशी आरोपींची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे बबन नरहरी गावडे (३८) यांचे हॉटेल आहे. गुरुवारी रात्री आरोपींनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु, त्यांनी पैसे न दिल्याने हॉटेल मालकास मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी बबन नरहरी गावडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हनुमंत वारे करीत आहेत. दरम्यान, रामनगर येथे बळीराम हणवते याने दारूच्या नशेत रमेश शेवाळे यांना डोक्यात दगड मारून जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
टेंभुर्णी येथे बस वाहकाने दारुच्या नशेत गुरुवारी एका ढाब्यावर बस थांबवून प्रवाशांशी हुज्जत घातली. भीमाशंकर नारायण हजबे, (३८, रा. काळेगाव) असे वाहकाचे नाव आहे. भीमाशंकर हजबे हे जाफराबाद ते टेंभुर्णी या बसमध्ये वाहक म्हणून आहेत. त्यांनी दारुच्या नशेत एका ढाब्यावर बस थांबवून प्रवाशांशी हुज्जत घातली. त्याचवेळी बस तपासणी पथक तेथे आले. व वाहकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सहायक वाहतूक निरीक्षक धर्मराव त्र्यंबकराव जुमळे (५२) यांच्या फिर्यादीवरुन भीमाशंकर नारायण हजबे याच्याविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.