अस्मानी संकटाचा कहर; गोठ्यावर वीज पडल्याने दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 06:51 PM2020-08-29T18:51:25+5:302020-08-29T18:59:19+5:30
महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला.
आव्हाना (जि. जालना) : वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक झाल्या. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
दगडवाडी येथील हिंमतराव पांडे यांचे गावच्या शिवारात शेत आहे. पांडे यांनी शुक्रवारी रात्री शेतातील गोठ्यात चार बैल, १० शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्यातच ३० गावरान कोंबड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य होते. या गोठ्यावर शनिवारी पहाटे अचानक वीज पडली. वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, ८ शेळ्या व ३० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोन बैलं आणि दोन शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेही गंभीर होरपळले आहेत.
घटनेची माहिती मिळताच माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अंकुश जाधव यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. या घटनेत हिंमतराव पांडे यांचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर
वीज पडल्याने लागलेल्या आगीत जनावरे जळून खाक झाल्याची माहिती समजताच पांडे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बैल, शेळ्यांसह कोंबड्यांची झालेली राख पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पांडे कुटुंबिय बैलांसह इतर जनावरांचा सांभाळ मोठ्या प्रेमाने करीत होते. त्यांचा मुलगा सतीश हा बैलांचा संभाळ करण्यावर आघाडीवर असायचा. मात्र, त्याच बैलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले होते.