लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 07:10 PM2022-05-10T19:10:01+5:302022-05-10T19:11:41+5:30
लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पकडली; पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल
टेंभुर्णी (जालना ) : लग्नासाठी इच्छुक तरुणांच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्यांची नंतर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश टेंभुर्णी पोलिसांनी सोमवारी केला. याप्रकरणी पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने लग्नासाठी मुली दाखवून अनेक तरुणांना फसवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे सविता माळीच्या शेतात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने माळीच्या शेतात धाड टाकली. पोलिसांना पाहताच तेथील लोकांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी औरंगाबाद येथून मुलीचे स्थळ दाखवून भडगाव ( जि.जळगाव) व फुलंब्री (औरंगाबाद ) येथील दोन युवकांना लग्नासाठी बोलाविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तरुणांना प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन लग्नासाठी त्यांच्या कुटुंबासह बोलावून घेतले होते. परंतु, दोन्ही वर पक्ष एकाच वेळी समोरासमोर आल्याने टोळीचा भांडाफोड झाला.
दोघांमध्ये वाद झाल्याने लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जळगाव येथील वधू पक्षाकडील लोकांनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी (रा. सातेफळ), सुनिता बाळूमामा माळी (रा.सावंगी वरगणे), सुषमा सुभाष बेळगे (रा. पवन नगर, वाळूज पंढरपूर ), अनिल जगन्नाथ बनकर ( रा. शृंगारवाडी ), शिला मनोहर बनकर (रा. एकतुनी ता.पैठण), शितल बाबुराव निकम (रा.विसरवाडी ता.पैठण ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
सूत्रधार फरार, फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार
या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये विविध मुलामुलींचे बायोडाटा आढळून आले आहेत. धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी, नांदेड येथील काही तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी सूत्रधार सविता माळी फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई सपोनि रविंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस कर्मचारी पंडित गवळी, वसुंधरा भांडेकर, छाया निकम, अशोक घोंगे, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, हरी शिरसागर, गजेंद्र भुतेकर ,मंगेश शिंदे , गणेश खाडे यांच्या पथकाने केली.