आयोगाच्या अध्यक्षांनी बैठक अर्धवट सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:25 AM2019-02-15T00:25:42+5:302019-02-15T00:26:28+5:30
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात योजनांचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ, पोलीस अधीक्षकांसह अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आढावा कोणाकडून घ्यावा आणि सूचना कोणाला द्याव्यात या मुद्यावरून शेख हे जाम चिडले होते, त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौºयावर आले होते. त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात ख्रिश्चन, जैन, मुस्लिम तसेच अन्य समाजातील शिष्टमंडळा सोबत चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी स्मशानभूमीचा मुद्दा तसेच रस्ते, दलित वस्तीची कामे, विद्यार्थ्यांना श्ौक्षणीक कर्ज घेतांना बँकांकडून अडवणूक केली जाते, असा अडचणींचा पाढा वाचला. या सर्व बाबींचे निवेदनही अध्यक्ष शेख यांना यावेळी देण्यात आले. निवेदनांवर अभ्यास करून आपण संबंधित विभागांना तशा सूचना देऊ, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
समाज बांधवांशी संवाद साधल्यावर दुपारी दोन वाजता अध्यक्ष शेख हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शेख यांनी जिल्हाधिकारी तसेच सीईओ आणि अन्य वरिष्ठ अधिकारी कोण-कोण हजर आहेत, याची विचारणा केली असता, जिल्हाधिकारी हे पुणे येथे निवडणूक कामानिमित्त गेले असल्याचे सांगण्यात आले. तर अप्पर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हे देखील दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चिडून जाऊन अध्यक्ष शेख यांनी बैठक घेण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत बैठक अर्धवट सोडली.
मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार
आपण दौ-यावर येणार असल्याची माहिती रीतसर प्रशासनाला कळवली होती. आपण आतापर्यंत २६ जिल्ह्यांचा दौरा केला, परंतु असा अनुभव कुठेच आला नाही. मात्र येथे अधिका-यांना त्यांच्या जबाबदारीचे भान नसल्याचे येथे दिसून आले. त्यामुळे गैरहजर कर्मचा-यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच खुलासा योग्य असल्यास ठीक नसता, त्यांच्याविरूध्द रीतसर कारवाई करण्यात येईल.