गुंतवणुकीसह उद्योग वाढीसाठी शेलगाव ते बदनापूरदरम्यान एमआयडीसीचा चाैथा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:09+5:302021-09-13T04:28:09+5:30

जालना शहर हे पूर्वीपासूनच व्यापार, उद्योगांसाठी ओळखले जाते. जालन्यात डाळ मिल, जिनिंग, तसेच आरमशिनसह लोखंडी कारखाने, बेअरिंग्ज तयार करणारी ...

Chaitha phase of MIDC between Shelgaon to Badnapur for industrial growth with investment | गुंतवणुकीसह उद्योग वाढीसाठी शेलगाव ते बदनापूरदरम्यान एमआयडीसीचा चाैथा टप्पा

गुंतवणुकीसह उद्योग वाढीसाठी शेलगाव ते बदनापूरदरम्यान एमआयडीसीचा चाैथा टप्पा

googlenewsNext

जालना शहर हे पूर्वीपासूनच व्यापार, उद्योगांसाठी ओळखले जाते. जालन्यात डाळ मिल, जिनिंग, तसेच आरमशिनसह लोखंडी कारखाने, बेअरिंग्ज तयार करणारी एनआरबी, मोटारसायकलच्या चेन तयार करणारी एलजीबी या कंपन्यांसह अनेक लघु उद्योग येथे विस्तारले आहेत. ही बाब लक्षात घेऊन जुनी एमआयडीसी ही जेईएस महाविद्यालयाजवळ होती. तो पहिला औद्योगिक वसाहतीचा पहिला टप्पा म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर जालना - औरंगाबाद मार्गावर एमआयडीसीचा जवळपास ४०० एकर परिसरावर दुसरा टप्पा १९८० च्या दशकात विकसित केला होता. आज याच टप्प्यात स्टीलसह वर उल्लेखित उद्योग विस्तारले आहेत. हा टप्पाही उद्योगांना कमी पडू लागल्याने शासकीय तंत्रनिकेतनजवळ औद्योगिकचा तिसरा टप्पा विकसित केला आहे. या तिन्ही टप्प्यात आता नवीन उद्योजकांसाठी जवळपास भूखंडच उपलब्ध नाहीत.

असे असताना अनेक बड्या उद्योजकांनी तिसऱ्या टप्प्यात मोठ-मोठे भूखंड स्वत:च्या नावावर खरेदी केले आहेत. परंतु तेथे काही मोजके उद्योग वगळता अन्य उद्योजकांनी त्यांचे भूखंड विकसित केले नसल्याचे वास्तव आहे. काही ठराविक वर्षात भूखंड एमआयडीसीकडून घेतल्यावर तेथे नवीन उद्योग उभारणे बंधनकारक असते. परंतु हे उद्योजक आपले सर्व वजन वापरून या भूखंडांच्या विकासासाठी मुदतवाढ घेऊन भूखंड हातातून सोडत नाहीत. ही देखील एक गंभीर बाब आहे.

जालन्यात कुशलसह अन्य मनुष्यबळ सहज उपलब्ध होते. तसेच येथे उद्योगांसाठी लागणारे वातावरण देखील सकारात्मक आहे. त्यामुळे आगामी काळात येथे अनेक उद्योग येऊ शकतात. परंतु यासाठी राजकीय मानसिकता बदलण्याची गरज पडणार आहे. आज औरंगाबाद ज्या पध्दतीने विकसित झाले, त्या पध्दतीवर जालन्यातही अनेक बडे उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांना येथील जमीन, वीज, तसेच अन्य महत्त्वाच्या सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु याचा अभाव येथे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर दिसून येत आहे.

श्रीमंतांकडून जमीन खरेदीच्या हालचाली

भविष्यात जालन्यातून थेट परदेशात निर्यात करणे शक्य होणार असून, त्यासाठी ड्रायपोर्टच्या कामाला आता शेवटचा धक्का देण्याची गरज आहे. याच भागात शेलगाव ते बदनापूर यादरम्यान एमआयडीसीकडून चौथा औद्योगिक विकासाचा टप्पा प्रस्तावित होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही केवळ चर्चा असली तरी, अनेक श्रीमंतांकडून ही कुणकुण लागताच, शेलगाव ते बदनापूरजवळील ड्रायपोर्टच्या आसपासच्या शेतजमिनी खरेदीसाठी सरसावले असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. ही जमीन आता खरेदी करून नंतर हीच जमीन एमआयडीसीने संपादित केल्यास बाजारभावाच्या पाचपट भाव मिळत असल्याने अनेकजण याकडे वळल्याचे चित्र आहे.

Web Title: Chaitha phase of MIDC between Shelgaon to Badnapur for industrial growth with investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.