चक्का जाम आंदोलन जिल्ह्याची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:49 AM2018-07-27T00:49:25+5:302018-07-27T00:49:43+5:30
मराठा आरक्षणानिमित्त जालना जिल्ह्यात गुरूवारी सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा आरक्षणानिमित्त जालना जिल्ह्यात गुरूवारी सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते.
चार ठिकाणी चक्का जाम
जालना : सकल मराठा समाजा बांधवांकडून गुरूवारी जालना शहरातही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबड चौफुलीवर चार तास चक्का जाम आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रूग्णवाहिकेला मात्र रस्ता मोकळा करून दिला जात होता.
सकाळी ११ वाजता कन्हैयानगर, चंदनझिरा, मंठा चौफुली आणि अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त तरूणांनी टायर जाळून सकारच्या वेळकाढू पणाबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. जालना शहरात एंट्री करणाऱ्या चारही मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनातील कार्यकर्ते घोषणाबाजी करत असले तरी ती शांततापूर्ण होती. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. विशेष करून शाळेच्या बसला रस्ता करून दिला जात होता. अंबड चौफुलीवर सर्वात जास्त वेळ म्हणजे चार तास आंदोलन करण्यात आल्याने अंबड जालना मार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आल्याने चारही ठिकाणी आंदोलनाच्या वेळी मोठा बंदोबस्त होता.
आंदोलनाची दिशा ठरणार
सलग तीन दिवस सकल मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. आज जरी हे आंदोलन येथे संपत असले तरी, राज्य पातळीवरील बैठक झाल्यावर त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आगामी आंदोलन कधी आणि कसे राहील याची कल्पना समाज बांधवांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. जोपर्यंत आरक्षण देण्या संदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत या ना त्या मार्गाने आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.