शिक्षण क्षेत्रात गुणात्मक वाढीचे आव्हान कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:09 AM2019-08-21T00:09:57+5:302019-08-21T00:11:22+5:30
शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली आहे. असे असले तरी गुणात्मक वाढ न झाल्याने शिक्षण क्षेत्रातील आव्हाने कायम आहेत.
जालना : शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली आहे. असे असले तरी गुणात्मक वाढ न झाल्याने शिक्षण क्षेत्रातील आव्हाने कायम आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षणावर सहा टक्के खर्च करावा, अशी धोरणात्मक तरतूद १९६६ पासून आहे. मात्र, इतक्या वर्षानंतरही हा खर्च केवळ चार टक्क्यापर्यंतच मर्यादीत आहे. कुठलेही शासन असले तरी याकडे लक्ष देत नसल्याची खंत सेवानिवृत्त विभागीय आयुक्त तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कृष्णा भोगे यांनी व्यक्त केली.
जालना येथील इंग्रजीचे गाढे अभ्यासक डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी भोगे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. येथील अग्रसेन फाऊंडेशनमध्ये हा गौरव सोहळा पार पडला. रामलाल अग्रवाल यांनी इंग्रजी साहित्यात दिलेल्या योगदानाची दखल म्हणून येथील आनंद फाऊडेशनच्या वतीने घेण्यात आली. यावेळी अध्यखस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे होते. यावेळी विजय बगडीया, अॅड. सतिश तवरावाला, डॉ. आदीनाथ पाटील, प्राचार्य जवाहर काबरा, प्राचार्य राजेंद्र गायकवाड, प्राचार्य भारत खंदारे, प्राचार्य अनंत चौधरी, प्रा. सुखदेव मांटे, प्रा. संदीप पाटील, मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, प्राचार्य शिवाजी मदन, प्रा. शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना कृष्णा भोगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त अभ्यासक लोक आहेत. तरी देखील समस्या कायम आहे. हे वास्तव स्विकारायला पाहिजे. आज घडीला ७५ टक्क्के महाविद्यालयात तासिका होत नाहीत. शिक्षण संस्थाची भूमिका, प्राध्यापकांची भूमिका आणि पालकवर्गाची भूमिका हे तीनही घटक एकत्र येऊन यावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे भोगे म्हणाले. कार्यक्रमात विविध संस्था, व्यक्तीतर्फे अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा. दिलीप फोके यांनी मानले.
यावेळी यावेळी प्राचार्य रमेश अग्रवाल, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, प्रा. भगवान डोभाळ, प्रा. यशवंत सोनुने, प्रा. संजय लकडे, प्रा. रानमाळ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
गौरव सोहळ्यातून प्रोत्साहान मिळते - रामलाल अग्रवाल
आदर व्यक्त करणे, गौरव करणे ही प्रथा आजकाल मोडित निघत असतांना आपला गौरव होणे, ही बाब आनंद व समाधान देणारी आहे. ज्यांनी आयुष्याच्या प्रवासात साथ - संगत केली, त्या सर्वांचे आभार व ऋण आपण मनापासून व्यक्त करतो असे सांगून रामलाल अग्रवाल यांनी सविस्तर विचार मांडले.