चांदई एक्को ग्रामपंचायत दोन दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:15 AM2017-12-21T00:15:58+5:302017-12-21T00:16:09+5:30
ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला वैतागून चांदई एक्को येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामसेविकेला कार्यमुक्त करेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
राजूर : ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला वैतागून चांदई एक्को येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामसेविकेला कार्यमुक्त करेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चांदई एक्को येथील ग्रामसेविका आर. एस. काळपांडे या मनमानी कारभार करीत असून सरपंचासह सदस्य व ग्रामस्थांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत वरिष्ठांकडेही निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ग्रामसेविका सतत गैरहजर होत्या. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे कामे खोळंबली होती.
ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी यांनी काळपांडे यांचा तात्पुरता पदभार काढून त्यांची १३ डिसेंबरला गावात प्रतिनियुक्ती केली. तसेच त्यांचा पदभार आर. एम. वाहूळे यांना देण्याचे सांगितले. परंतु वरिष्ठांच्या आदेशानंतरही काळपांडे पदभार सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी सोमवारी चांदई एक्को ग्रामपंचायत कार्यालयात येऊन काम सुरू केले. सरपंच सुनीता ढाकणे व त्यांंचे पती नानासाहेब ढाकणे कार्यालयात आल्यानंतर ग्रामसेविकेने त्यांना ग्रामस्थांसमक्ष तुम्हाला कोणताही अधिकार नाही, तुम्ही माझी कोणतीही चौकशी करू शकत नाही. अशी अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेविकेला बाहेर काढून कार्यालयाला कुलूप ठोकले. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत बंद असल्याने ग्रामस्थांच्या कामाचा खोळंबा होत आहे.