चांधई एक्को ग्रामपंचायत बिनविरोधच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:17 AM2020-12-28T04:17:12+5:302020-12-28T04:17:12+5:30
फोटो राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एका बैठकीत घेतला आहे. यात ११ ...
फोटो
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एका बैठकीत घेतला आहे. यात ११ सदस्यांची बिनविरोध निवडसुध्दा करण्यात आली आहे. या निर्णयप्रक्रियेवर ४ जानेवारी रोजी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
राजूर जिल्हा परिषद गटातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सध्या कडाक्याच्या थंडीत गावागावांत निवडणूक प्रचाराने वातावरण तापले आहे. गटातील सर्वात मोठे गाव असलेल्या चांधई एक्को येथील ग्रामस्थांनी शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांची बैठक घेतली. यावेळी गावचे भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक अंबादास ढाकणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावात होणारे वैमनस्य रोखण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव मांडला. निवडणुकीमुळे अनेक गावांत भावकीसह घराघरांत दोन गट पडून कायमस्वरूपी वैमनस्य निर्माण होते. तसेच अंतर्गत राजकारणामुळे विकासकामाला खीळ बसते. गावात बिनविरोध निवड झाल्यास विकासकामाला चालना मिळून सलोख्याचे संबंध कायम राहतात. त्यामुळे अंबादास ढाकणे यांनी सुचविल्यामुळे ग्रामस्थांनी गावात निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यामधे नव्या व जुन्यांचा मेळ बसवून अकरा सदस्यांची निवड करण्यात आली. यात रामदास विठोबा तळेकर यांना सरपंचपदी विराजमान करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. मात्र, यावर ४ जानेवारी रोजी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. यावेळी रामदास तळेकर, अंबादास ढाकणे, नानासाहेब ढाकणे, आण्णा ढाकणे, जगन पवार, प्रभाकर तळेकर, गणेश ढाकणे, बबन गंगावणे, गणेश टोम्पे, कैलास टोम्पे, नारायण पवार, देवराव तळेकर, बबन मोरे, दादाराव पवार, सुदाम तळेकर, मुरली ढाकणे, शिवनारायण ढाकणे, संजय गंगावणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
विकास कामांची संधी
निवडणूक न घेता ग्रामपंचायत बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतीसाठी आमदार नारायण कुचे यांनी २० लाख तर जिल्हा परिषद सदस्या शोभा पुंगळे यांनी २५ लाखांचा निधी जाहीर केलेला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली तर या गावाला विकास कामांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
कॅप्शन : चांधई एक्को ग्रामपंचायतच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन सदस्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.