काळ्या बाजारावर टाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:38 AM2018-01-02T00:38:47+5:302018-01-02T00:39:06+5:30
स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.
जालना : स्वस्त धान्याच्या काळा बाजाराला आळा बसावा, धान्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी जिल्ह्यात स्वस्त धान्याची द्वारपोच वाहतूक केली जात आहे. स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य योजनेचे तीन लाख १९ हजार लाभार्थी आहेत, तर रेशन कार्डधारकांची संख्या तीन लाख ५३ हजार आहे. जिल्ह्यातील १२८० विक्रेत्यांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप केले जाते. शासनाकडून प्राप्त होणारा तांदूळ, गहू साठविण्यासाठी जालना शहरात अन्न महामंडळाची जिल्हा स्तरावर भोकरदन नाका परिसर व बोरखेडी येथे दोन गोदामे आहेत. या गोदामांतून आठही तालुक्यांतील गोदामांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्यासाठी यापूर्वी खाजगी वाहनांचा वापर केला जात होता. तालुका स्तरावरील गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार आपल्या सवडीप्रमाणे न्यायचे. यासाठी त्यांना प्रतिक्विंटल केवळ १९ रुपये वाहतूक खर्च मिळत होता. मात्र, अशा पद्धतीने वाहतूक करताना स्वस्त धान्याचा काळा बाजार होण्याचे प्रकार समोर आले होते. बहुतांश वेळा विक्रेते महिन्याच्या शेवटी गोदामातून धान्य घेऊन जात असल्याने लाभार्थ्यांना या महिन्याचे धान्य पुढील महिन्यात मिळत होते. या सर्व प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्य द्वारपोच वाहतूक यंत्रणा सुरू केली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात या माध्यमातून ४० हजार क्विंटल गहू व २४ हजार क्विंटल तांदूळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी दिली.