नगरसेविकांच्या पतीराजांच्या चमकोगिरीला ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:20 AM2017-12-06T00:20:41+5:302017-12-06T00:21:40+5:30
जालना : पत्नी नगरसेविका असताना आपण नगरसेवक असल्याच्या तो-यात राहून नगर पालिकेच्या कामात हस्तक्षेप करणा-या पतीराजांच्या मनमानीला आता ब्रेक ...
जालना : पत्नी नगरसेविका असताना आपण नगरसेवक असल्याच्या तो-यात राहून नगर पालिकेच्या कामात हस्तक्षेप करणा-या पतीराजांच्या मनमानीला आता ब्रेक लागणार आहे. नगर परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणा-या पतीराजांवर आता नगरविकास विभागाकडून कारवाई केली जाणार असून, तसे आदेशच सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांना देण्यात आले आहेत.
या संदर्भात नगविकास शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिका-यांनी जालना, अंबड, परतूर, भोकरदन नगर पालिका तसेच बदनापूर, घनसावंगी, मंठा व जाफराबाद नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांना आदेश दिले आहेत. महिलांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात सहभाग वाढावा, ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासात महिलांना प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, या हेतूने महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, ज्या महिला स्थानिक स्वराज्य संंस्था तसेच नगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून जातात, अशा महिलांचे पती ग्रा.पं., जि. प., नगरपंचायत तसेच नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात. आपणच नगरसेवक असल्यासारखे वागून अधिकारी आणि कर्मचा-यांवर दबाव टाकतात. नियमबाह्य कामे करून घेतात. हे थांबविण्यासाठी नियमबाह्य हस्तक्षेप करणा-या नगरसेविकांच्या पतींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिका-यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.
--------------
नगराध्यक्षांऐवजी पतींची हजेरी
आठवडाभरापूर्वी पालकंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन सभागृहात नगरपालिका व नगरपंचायतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत सातपैकी तीन नगराध्यक्षांऐवजी त्यांचे पती हजर राहिले. तर पंचवीस नगरसेविकांऐवजी त्यांच्या पतींनी बैठकीत सहभाग घेतला. याबाबत अधिका-यांनी विचारणाही केली. मात्र, महिला असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, असे मोघम उत्तर पतीराजांनी दिल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.