जालन्यात वाळू माफियांचे दहावर्षापूर्वीचे रेकॉर्ड तपासून होणार मोक्का अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:20 PM2018-10-30T19:20:45+5:302018-10-30T19:26:15+5:30
गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जालना : अवैध वाळूचे उत्खन आणि त्याची अवैध मार्गाने होणारी वाहतूक हा प्रश्न गंभीर बनला असल्याची जाणीव आपल्याला आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील वाळूशी संदर्भातील गेल्या दहावर्षापूर्वीच्या सर्व गुन्ह्याची माहिती काढून, त्यातील गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या चार दिवसांपासून मुत्याल हे जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन तपासणी केली. तसेच पोलीसांच्या एकूणच तपास यंत्रणा, प्रात्याक्षीक, परेड आदींचे निरीक्षण मुत्याल यांनी केले. सोमवारी जनता दरबारही घेततला. यावेळी अनेक मान्यवरांनी मुत्याल यांच्या समोर गाऱ्हाने मांडली. अतिक्रमण काढण्यासह वाढती गुंडगर्दी तसेच वाहतूकीच्या समस्येवर जनता दरबारात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत मुत्याल यांनी सांगितले की, जिल्ह्यात गुन्ह्यांचा तपास हा जलदगतीने होत असल्याचे सांगून यात गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण हे अत्यल्प असले तरी त्यात वाढ करण्यासाठी आता जवळपास प्रत्येक तालुका निहाय विधी अधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परीक्षाधिन पोलीस अधीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांची उपस्थिती होती.