जालना जिल्हा रुग्णालयात सुरू होणार केमोथेरपी युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:49 AM2019-12-01T00:49:02+5:302019-12-01T00:49:52+5:30
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह इतर कारणांनी होणाऱ्या कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार पध्दती युनिट लवकरच जालना जिल्हा रूग्णालयात सुरू होणार आहे
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह इतर कारणांनी होणाऱ्या कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार पध्दती युनिट लवकरच जालना जिल्हा रूग्णालयात सुरू होणार आहे. या युनिटमध्ये मौखिक कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. युनिटसाठी लागणा-या औषधींची मागणीही वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे.
धावपळीच्या युगात बदललेली जीवनशैली, असंतुलीत आहार, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, औषधांचा अतिरेक, तंबाखूजन्य पदार्थांसह इतर जडलेली व्यसने अशा एक ना अनेक कारणांनी विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. यात कॅन्सरसारख्या आजाराचा विळखाही वाढू लागला आहे. यापूर्वी ४५-५० वर्षावरील कॅन्सरचे अधिक रूग्ण आढळून येत होते. मात्र, आता हे प्रमाण ३० वर्षापर्यंत आले आहे. कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना करावा लागतो. जालना जिल्ह्यात आढळून येणाºया रूग्णांना खासगी रूग्णालयात किंवा औरंगाबादसह इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन कॅन्सरवरील उपचार घ्यावे लागत होते. यात रूग्णांचा वेळ आणि पैसाही जात होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने जालना जिल्हा रूग्णालयात कॅन्सरवरील उपचारासाठी केमोथेरपी युनिट मंजूर केले आहे.
या कॅन्सर युनिटमध्ये मौखिक कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. या युनिटसाठी लागणा-या औषधांची मागणीही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे. औषधांचा पुरवठा झाल्यानंतर कॅन्सरग्रस्त रूग्णांवर केमोथेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत.
खासगी रूग्णालयात लाखोचा खर्च
मौखिक कॅन्सर, गर्भाशय पिशवीचा कॅन्सर असो अथवा स्तनाचा कॅन्सर; यावरील उपचारासाठी खासगी रूग्णालयात लाखो रूपयांचा खर्च होतो. मात्र, जिल्हा रूग्णालयात सुरू होणा-या केमिओथरपी युनिटमुळे रूग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
डॉक्टरांना प्रशिक्षण
जालना जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी युनिट सुरू होणार आहे. त्यामुळे येथील डॉ. राजेंद्र गाडेकर व एका स्टाफ नर्सला मुंबई येथील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात गरजेनुसार इतरांनाही वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.