"छगन भुजबळ बेइमान माणूस, त्यांना गोड बोलून राज्यात दंगली घडवायच्यात": मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 05:03 PM2024-07-15T17:03:36+5:302024-07-15T17:04:07+5:30
अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात: मनोज जरांगे
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ''छगन भुजबळ यांना राज्यात गोड बोलून दंगली घडवायच्या दिसतात. ते कोणाचेच नाहीत. फक्त स्वतःच घर कसं भरलं, हेच पाहतात. अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात. इतके वाद लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण दूषित केलं त्यांनी. आता जाऊन सांगतात की, शांतता राहिली पाहिजे. इथून मागे नीट वागायचं ना कशाला शेण खाल्ल'', अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर केली.
पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. या दरम्यान त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, ''छगन भुजबळ गेले काय आणि राहिला काय, कुठे बसलाय काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. लय बेईमान आहे, जिथे खातात तिथेच घाण करतात. त्यांना वाटतं असंच पेटत ठेवायचं आणि विधानसभेला फायदा उचलायचा. हातात त्यांच्या आहे की तुमच्या आहे, त्यांना द्या ना लाथ मारून काढून.'' असे आवाहन जरांगे यांनी केले.
मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठकीला बहिष्कार घातला, यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ''तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे. तर तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. याच्या त्याच्याकडे बोट दाखवता. त्या छगन भुजबळच्या आहारी चालले. हा छगन भुजबळ यांचा नवीन डाव आहे. तोही सरकारनेच आखायला लावला असेल अस मला वाटतं. मिडियात सांगायचं की, शांतता राहिली पाहिजे म्हणून. मी याच्यात्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतोय असं याला दाखवायचं आहे, असा डाव दिसतोय. पण शांतता शब्द वापरायचा आणि राज्यात दंगल लावून द्यायची'', अशी टीका जरांगे यांनी केली.
सरकार म्हटल तर बलिदान देण्यास तयार
''माझ्या समाजासाठी जीवाची बाजी लावू शकतो. सरकारने माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून जरी मागितले तरी मराठा आरक्षणासाठी द्यायला तयार आहे. सरकार जर म्हणल तुझं मुंडकं उद्या सकाळी तोडून दे, आम्ही आरक्षण देतो. तर मी उद्या सकाळी शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या दारात मुंडकं तोडून द्यायला तयार आहे. समाज आपला मायबाप आहे. तर मरायला काय घाबरायचे. आपल्या समाजासाठी आपला जीव जाईल त्याच्या पलीकडे काय होईल. माझ्या समाजासाठी माझं बलिदान गेलं तर समाजाच तरी कल्याण होईल'', असेही जरांगे म्हणाले.