देशातील कृषी धोरणाचा पाया छत्रपतींनी घालून दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:35 AM2021-03-01T04:35:01+5:302021-03-01T04:35:01+5:30
जालना : रयतेचा लोककल्याणकारी राजा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील कृषी क्षेत्राचा पाया कसा असावा हे छत्रपती शिवाजी ...
जालना : रयतेचा लोककल्याणकारी राजा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील कृषी क्षेत्राचा पाया कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे प्रतिपादन विजय कुमठेकर यांनी केले.
बहुजन संघटकच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बहुजन संघटकचे प्रमुख राहुल खांडेकर, सर्वजीत बनसोडे, हर्ष थुल, सौरभ गाणार यांचा प्रमुख सहभाग होता. छत्रपतींचा इतिहास हा केवळ हिंदू- मुस्लिम धार्मिक लढाईसाठी नाही तर शेतकरी, कामगार यांच्या जीवावर सत्ता प्राप्त करुन त्यांनी आपल्या राज्यकारभारातून प्रशासकीय कारभार, लष्करी कारभार, राजकीय कारभार, न्यायालयीन कामकाज, परराष्ट्रीय धोरण, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व कृषी धोरण कसे असावे, याचा पाया घालून दिला.
लोकशाहीतील शेतकऱ्यांपेक्षा शिवशाहीतील शेतकरी अत्यंत आनंदी व समाधानी होता. कारण त्याला कधीच आजच्या शेतकऱ्यासारखी आत्महत्या करावी वाटली नाही. महाराष्ट्रातील सामान्य माणसाची नाळ ही शेतीशी निगडित आहे. भविष्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर माणसांचे व पशुधनांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पशुधन महत्वाचे आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी आपली जनावरे कसायास स्वस्तात विकू नये. पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब आडवावा व पाण्याचा जपून वापर करावा अशा सूचना दिल्या होत्या.
देशात सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना छत्रपतींनी आपल्या स्वराज्यात राबविल्या. त्यामुळे स्वराज्यातील जनता मरायला व मारायला सदैव तयार असलेली दिसून येते. पारंपरिक चालत आलेली पदे पाटील, देशमुख, सरदेशमुख, कुलकर्णी, पटवारी काढून घेतली. आपल्या सत्तेचे विकेंद्रीकरण केले. शेतकऱ्यांच्या हातात तलवार देऊन मनगटात बळ पेरण्याचे काम केले. आपल्या सेनेचे वर्तन कसे असावे हे सांगत रयतेची जीवापाड काळजी घेतली. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही विना परवानगी हात लावू नका असा आदेश दिला होता, असेही कुमठेकर म्हणाले.
दुष्काळात मदत
दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीचे अवजारे, बैल-बारदाणा सरकारी तिजोरीतून दिला गेला. आपल्या स्वराज्यात जलसिंचनाचे कामे करुन घेतली. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी राबविल्याचे कुमठेकर यांनी सांगितले.