शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम
By विजय मुंडे | Published: June 2, 2023 06:31 PM2023-06-02T18:31:50+5:302023-06-02T18:32:13+5:30
राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड
जालना : जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या ३० मुला- मुलींना मोफत जेईई, आयआयटी, नीटचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार असून, परीक्षेद्वारे या ३० मुला- मुलींची निवड केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची जेईई, आयआयटी, नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. परंतु, ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं-मुली हुशार असली तरी त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेच्या वतीने १५ मुले आणि १५ मुलींना दोन वर्ष कालावधीत अकरावी- बारावी शिक्षणासोबतच जेईई, आयआयटी, नीटचे मोफत धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ११ जून रोजी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १२० गुणांची परीक्षाजालना येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेतली जाणार आहे.
मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे धडे देण्यासाठी मानधन तत्त्वावर चार तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. हे चार तज्ज्ञ या ३० विद्यार्थ्यांची पुढील दोन वर्षात जेईई, आयआयटी, नीटची तयारी करून घेणार आहेत.
या शाळांतील मुलं होणार पात्र
जिल्ह्यातील जिल्हा प्रशाला व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून दहावीची परीक्षा दिलेले मुलं- मुली पात्र राहणार आहेत. या मुला-मुलींनी निर्धारित वेळेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करणे गरजेचे आहे.
मोफत निवास अन् भोजनाची व्यवस्था
परीक्षेद्वारे निवड केल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या निवास, भोजनाची मोफत व्यवस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील इमारतीत केली जाणार आहे. शाळेतील प्रवेशासाठीही जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जाणार आहे.
मोफत प्रशिक्षण देऊ
जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दहावीनंतर जेईई, आयआयटी, नीटची तयारी करताना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू ३० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना