बालकांनो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने अभ्यास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:03+5:302021-06-16T04:40:03+5:30
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे : शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट जालना : जालना शहरातील शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकारी ...
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे : शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जालना : जालना शहरातील शासकीय निरीक्षण व बालगृहाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. या बालगृहातील प्रत्येक बालकाच्या संरक्षणाबरोबरच बालकांना त्यांच्या पाल्यांची उणीव भासणार नाही, यादृष्टीने पालकांप्रमाणे त्यांची काळजी घेण्याचे निर्देश देत, शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद असून, उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक बालकाने जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या भेटीप्रसंगी बालन्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी व्ही. एस. यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संगीता लोंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मानसोपचार तज्ज्ञ दीपाली मुळे, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. मनोहर बन्सवाल, शासकीय निरीक्षण गृहाचे अधीक्षक अमोल राठोड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करत, या बालकांच्या संगोपनामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या, तसेच या बालगृहासाठी कुठल्याही बाबींची कमतरता असेल, तर प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येक बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, बालकांना ताप, सर्दी, खोकला, यासारखी काही लक्षणे असतील तर तातडीने त्यांच्यावर उपचाराची सोय करण्यात यावी. बालकांना या निरीक्षण गृहात देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच या निरीक्षण गृहातील प्रत्येक खोल्यांची तसेच परिसराची नियमितपणे स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच निरीक्षण गृहामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरेने पूर्ण करून घेण्याच्या सूचना करत या निरीक्षण गृहामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केली.
बालकांशी साधला संवाद
निरीक्षण गृहामधील बालकांशीही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून या बालकांना बोलते केले. या निरीक्षण गृहामध्ये तुम्हाला वेळेवर जेवण दिले जाते का, जेवण चांगले असते का, तुमच्या आरोग्याची तपासणी नियमितपणे केली जाते का, तुम्हाला मोठे होऊन काय व्हायचे आहे, या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत मायेने व आस्थेवाईकपणाने विचारलेल्या प्रश्नांना बालकांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.