गोवरची लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:57 PM2017-11-17T23:57:06+5:302017-11-17T23:57:24+5:30
गोवरची लस दिल्यानंतर एका अकरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. जालना तालुक्यातील पोकळ वडगाव येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
जालना : गोवरची लस दिल्यानंतर एका अकरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. जालना तालुक्यातील पोकळ वडगाव येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. घटनेनंतर आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन चौकशी केली. मात्र, बालकाचा मृत्यू लस दिल्यामुळे झाला नसल्याचे सांगत जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
पोकळवडगाव येथे दुधना काळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका खेडकर व आरोग्य सेवक जावळे हे शुक्रवारी गावात नियमित लसीकरणासाठी गेले होते. त्यांनी गावातील सात बालकांना गोवरची लस टोचली. तसेच जीवनसत्त्व ‘अ’ चे औषध तोंडाद्वारे पिण्यास दिले. गावातील बद्रीनाथ बाळू उजेड या अकरा महिन्यांच्या बालकाला अशाच पद्धतीने लस व डोस देण्यात आला. लस दिल्यानंतर काही मिनिटांतच बद्रीनाथला उलट्या सुरू झाल्या. त्याची प्रकृती खालावून लागल्याने नातेवाईक त्याला जालना येथे उपचारासाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या दोन्ही कर्मचाºयांना या प्रकाराबाबत माहिती देऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य बालकांना काहीच झाले नसल्याने बद्री उजेड या बालकाचा मृत्यू कशामुळे झाला हे आम्ही कसे सांगणार, असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले. ग्रामस्थांनी दोन्ही कर्मचाºयांना गावात थांबवून वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क केला. वरिष्ठ अधिका-यांनी सुरुवातीला या घटनेकडे दुर्लक्ष केले. नातेवाईकांनी आरोग्य अधिकाºयांची पाच तास वाट पाहिली. मात्र, ते सायंकाळी पाचपर्यंत न आल्यामुळे अंत्यसंस्कार केले. अंंत्यसंस्कार झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी एस. ए. सोनी हे पथकासह आले. चौकशीची औपचारिकता पूर्ण करून ते जालन्यात परतले.
-------------
या विषयी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना विचारले असता, कुठलीही लस दिल्यामुळे बालकाचा मृत्यू होत नाही. मृत झालेला बालक पूर्वीपासून आजारी होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. बालकाचा मृत्यू नेमका गोवर लस टोचल्यामुळे झाला की अन्य कारणामुळे हे सांगता येणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.