रमाबाईनगर, अण्णा भाऊ साठेनगरातील चूल पाच दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:24+5:302021-09-27T04:32:24+5:30
जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील ...
जालना : अतिवृष्टीमुळे रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तब्बल पाच दिवसांपासून अनेकांच्या घरातील चुली पेटल्या नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या भागातील नागरिकांची शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भेट घेऊन संवाद साधला. तसेच गरजू नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता करून दिली.
शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी असल्याने त्यांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगर भागाची स्थिती गंभीर होती. ही माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शहरप्रमुख विष्णू पाचफुले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दीपक राननवरे, मिलिंद काळे, सुभाष पितांबरे यांच्यासह त्या भागात धाव घेतली. यावेळी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांच्या व्यथा अनेकांनी मांडल्या. या भागात प्रत्येक पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावेळी अंबेकर यांनी संबंधितांशी चर्चा केली. तसेच आबाल-वृद्धांच्या अन्नाची सोय करून दिली. यावेळी या भागातील नागरिक उपस्थित होते.
चौकट
प्रशासनाकडे पाठपुरावा
शहरातील रमाबाई नगर, अण्णा भाऊ साठे नगरमधील सद्य:स्थिती बिकट आहे. अनेकांच्या घरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी जात आहे. ही बाब आपण प्रशासनासमोर मांडणार आहोत. शिवाय त्यांचे प्रश्न सोडवून मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख शिवसेना
फोटो