सिडको प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:01 AM2019-01-28T01:01:04+5:302019-01-28T01:01:50+5:30
सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सिडको प्रकल्पासाठी पूर्वी मंजूर झालेली नियोजित जागा बदलून आता जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात जवळपास ५०० ते ५५० हेक्टरवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
तसेच काही शेतकऱ्यांना सिडको प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या विकल्पाच्या नोटिसा देखील आल्या आहेत. परंतु, याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, यासाठी शेतकरी कोणत्याही प्रकारे आंदोलन करण्यात तयारीत आहेत. यामुळे शासनाने तातडीने शेतक-यांचा विचार करावा, अन्यथा आम आदमीतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाचे सुभाष देठे यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.
जर सिडको प्रकल्पाला जमीन हवी असल्यास समृद्धीच्या धर्तीवर (जमिनीच्या पाच पट) पैसे द्यावेत, कुटुंबातील एकाला प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर शासकीय सेवेत सामावून घ्यावे, नागेवाडी परिसरातील ८ ते ९ वर्षांपूर्वी आरक्षित केलेल्या जमिनीला किरायापोटी वार्षिक प्रति एकर २० हजार रूपये देण्यात यावेत, जमिनीचे नॉन अॅग्रीकल्चर हे आरक्षण कायम करावे, दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) फीसमध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी, या सर्वांवर शासनाने १५ फेब्रुवारी पर्यंत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पाबाबत नुकतीच खरपुडी येथे ग्रामसभा घेण्यात आली आहे. यात सिडको हा प्रकल्प येथून रद्द करून तो इतरत्र शासनाच्या जागेवर प्रस्तावित करावा, असा एकमुखी ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला असल्याचीही माहिती देठे यांनी दिली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जालना विधानसभा निरीक्षक बळीराम कोलते, एकनाथ शेजूळ, तनुज बाहेती, काकासाहेब भालेराव, हरिभाऊ शेजूळ उपस्थित होते.