मंडळ अधिकारी, तलाठ्यास १४ हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:02 AM2019-07-09T01:02:48+5:302019-07-09T01:03:13+5:30
मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना तालुक्यातील विरेगाव येथील मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली यांनी एका शेतकऱ्याच्या सातबारामध्ये त्यांच्या आडनावात दुरूस्ती करण्यासाठी लाच मागितली होती. त्यापैकी लाचेचा पहिला हप्ता म्हणून या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या सातबाराच्या उता-यावर आडनावात चूक झाली होती. ही चूक दुरूस्त करण्यासाठी प्रथम संबंधित शेतक-याने तलाठी गुल्लापेल्ली यांची भेट घेतली. तसेच आडनावात बदल करून देण्यासाठी विनंती केली. परंतु ही दोन प्रकरणे असल्याने गु्ल्लापेल्ली यांनी प्रत्येक सहा हजार रूपये लागतील असे तक्रारदारास सांगितले. तसेच मंडळ अधिकाऱ्यांकडून फेर मंजूर करण्यासाठी स्वतंत्र रक्कम द्यावी लागेल, असेही नमूद केले.
त्यानंतर त्या तक्रारदाराने कांचननगर येथे राहत असलेले मंडळ अधिकारी भार्डीकर यांच्या निवासस्थानी जाऊन विनंती केली. परंतु गुल्लापेल्ली यांनी सांगितलेली रक्कम योग्य असल्याचे सांगून २५ हजार रूपये लागतील, असे भार्डीकर यांनी सांगितले. परंतु संबंधित तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी या विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तलाठी गुल्लापेल्ली याने भार्डीकर यांच्या सांगण्यावरून १४ हजार रूपये घेतले. तसेच ते परस्परांमध्ये वाटूनही घेतले. परंतु पैसे खिशात ठेवून हे दोघे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत बसले असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्या दोघांना बैठकीतून बाहेर बोलावून घेत अटक केली. तेथेच त्यांचा पंचनामा केला. यावेळी दोन्ही कर्मचारी विनंती करताना दिसून आले. अटक करण्यात आल्याचे समजताच दोघांनाही घाम फुटला होता. जिल्हाधिकाºयांच्या दालनाशेजारील एका खोलीत या दोन्ही संशयितांना थांबवून पंचनामा केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक श्रीकांत परदेशी, उपअधीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भ्रष्टाचार निर्मूलनाची बैठक अन सापळा
दर महिन्याला होणारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी होती. त्यासाठी देखील पोलीस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी हे सोामवारी दुपारी बैठकीस आले होते. परंतु तेथेच त्यांनी हा सापळा रचल्याची खबर कोणालाही कळली नाही.
अचानक अधिका-यांची लगबग आणि पोलिसांच्या खास शैलीत ए.सरका.. बाजूला असे म्हणत त्या दोन लाचखोरांना एका बंद खोलीत नेऊन नंतर पोलिसांच्या जीपमधून अटक करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले.
ही बैठक सुरू असतानाच या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर नेमके काय झाले हे अधिका-यांना कळण्यापूर्वीच त्या दोघांना अटक केली होती. नेमकी किती लाच कोणी घेतली, यावरूनही तर्कवितर्क लावले जात होते.