फेर सर्वेक्षणासाठी नागरिकांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:52 AM2019-12-18T00:52:13+5:302019-12-18T00:52:28+5:30
जालना शहरातील नागरिकांच्या मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी भरमसाठ वाढ केली आहे, ती चुकीची आहे. त्यामुळे नव्याने फेर सर्वेक्षण करून योग्य आकारणी करावी अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील नागरिकांच्या मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी भरमसाठ वाढ केली आहे, ती चुकीची आहे. त्यामुळे नव्याने फेर सर्वेक्षण करून योग्य आकारणी करावी अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी सहाशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडले.
तीन वर्षापूर्वी जालना पालिकेने एका खासगी सर्वे एजन्सीकडून शहरातील मालमत्तांची मोजणी केली होती. ही मोजणी २०१६ मध्ये केली होती. त्याचवेळी नगरसेविका संध्या देठे यांनी संबंधित कोलोब्रो कंपनीच्या फेर मूल्यांकन अहवालावर आक्षेप घेऊन या कंपनीची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याच्या चौकशीचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु त्यावेळी या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे आज ही अधिकची करवाढ नागरिकांच्या माथी मारण्यात आल्याचे सांगण्यात आले.