टाक्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:13 AM2019-03-20T01:13:21+5:302019-03-20T01:13:34+5:30
नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तसेच जायकवाडी धरणातूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात यंदा पुरेशा प्रमाणात पाणी साठले नाही. यामुळे मार्च महिन्यापर्यत घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी आता आठवड्यातून एकदा येत आहे. तलावात पुरेशा प्रमाणात पाणी असतांनाही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन्ही ऋतूतही नागरिकांची पाण्याविना गैरसोय होते, परिणामी अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागते.
यामुळे शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे पाणी साठविण्यासाठी नागरिकाकडून प्लास्टिकच्या टाक्याची मागणी वाढली आहे. शहरातील मामाचौक, बाजार परिसरात असलेल्या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या टाक्या
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.
पाण्याची नासाडी
शहरात पाणी सोडण्याची कुठलीच ठराविक वेळ नाही. यामुळे रात्री - बेरात्री नळाला पाणी येते. तसेच शहरातील बहुतांश नळाला तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पिण्यायोग्य पाणी वाहून जाते. एकीकडे पाणी नसल्याची ओरड होत असतांना पाण्याच्या नासाडीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु आहे.