गावठाणातील नागरिकांना मिळणार पीआरकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:48+5:302021-03-05T04:30:48+5:30
या दृष्टीने याआधीच गावठाण परिसराचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिकतत्त्वावर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात हा प्रयोग करण्यात ...
या दृष्टीने याआधीच गावठाण परिसराचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिकतत्त्वावर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात हा प्रयोग करण्यात येत असून, आतापर्यंत ५८ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांनी जमाबंदी विभागाचे नूतन आयुक्त एन. के. सुधांशू यांना दिली.
गुरुवारी सुधांशू हे जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जालना तालुक्यातील राममूर्ती येथे भेट देऊन या भागातील सर्वेक्षणाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपाध्यक्ष, भूमी अभिलेख समीर दानेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गावठाण परिसराचा ड्रोनव्दारे डिजिटल नकाशा काढण्यात येतो. ज्यांचे जेवढे घर असेल तेवढे ड्रोन कॅमेऱ्यात टिपून त्याचा नकाशा म्हणजेच चतुसीमा निश्चित केल्या जातात. नंतर संबंधितांना पीआरकार्ड अदा करण्यात येणार असल्याचेही घोडके यांनी यावेळी सांगितले.