शहरवासीयांना मिळणार ३८ प्रकारच्या आॅनलाईन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:38 AM2020-02-10T00:38:57+5:302020-02-10T00:39:18+5:30
नगर पालिकेने सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत तब्बल ३८ सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नागरिक, व्यावसायिकांची विविध कामांसाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नगर पालिकेने सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत तब्बल ३८ सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगरपालिकेने सुरू केलेल्या आपले सरकार या संकतस्थळावर आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.
नगर विकास विभागाच्या सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत जालना नगर पालिकेने आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा, मालमत्ता कर, व्यवसाय परवाना, ना हरकत प्रमाणपत्र अशा एकूण ३८ सेवा आॅनलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सेवांमध्ये पाणी पुरवठा विभागाअंतर्गत नवीन नळ जोडणी, मालकी हक्कात बदल करणे, नळ जोडणी आकारात बदल करणे, तात्पुरते-कायम स्वरुपी नळ जोडणी खंडीत करणे, पुन:जोडणी करणे, वापरामध्ये बदल, पाणी देयक तयार करणे, प्लंबर परवाना, प्लंबर परवाना नुतनीकरण करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, नादूरुस्त मीटर तक्रार करणे, अनधिकृत नळ जोडणी करणे, पाण्याची दबाव क्षमता तक्रार, पाण्याची गुणवत्ता तक्रार तसेच कर विभागांतर्गत नव्याने कर आकारणी करणे, पुन:कर आकारणी, कराचे मागणी पत्र तयार करणे, कर माफी मिळणे, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता कर उतारा देण, रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे, आक्षेप नोंदविणे, मालमत्ता पाडणे व पुर्नबांधणी आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे इतर मार्गाने, उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन, स्वयंमुल्याकंन तसेच परवाना विभागांतर्गत नवीन परवाना मिळणे,
परवान्याचे नुतनीकरण, परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलने, व्यवसाय बदलने, परवानाधारक- भागिदाराचे नांव बदलने, भागिदाराच्या संख्येत बदल, परवाना रद्द करणे, कालबाहय परवाण्यासाठी नुतनीकरण करणे तसेच ना-हरकत- अग्निशमन ना-हरकत दाखला, मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, व्यापार, व्यवसाय, साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र आदी ३८ प्रकारच्या सेवा ह्या आॅनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहेत.