रोहयोच्या कामासाठी सीटूचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:07 AM2019-02-18T01:07:15+5:302019-02-18T01:07:49+5:30
परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली.
परतूर तालुक्यात दुष्काळामुळे परिस्थिती भयावह झाली आहे.शेतीचे कामे नसल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजूर युनियनच्या वतीने तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यासाठी वारंवार मोर्चा काढून मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. थातूरमातूर दोन ते तीन गावांत कामे सुरु करण्यात येते, आणि पुन्हा काम बंद करण्यात येत असल्याने मजुरांची हेळसांड होत आहे. प्रत्येक गावात मजूर संख्येच्या प्रमाणात दोन कोटी रुपयांचा सेल्फ निर्माण करा, कामाची मागणी करुन कामे न मिळालेल्या मजुरांना बेरोजगार भत्ता वाटप करा, दुष्काळात मोफत चारा मोफत रेशन सुरु करा इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मारोती खंदारे, सरिता शर्मा, सचिन थोरात, बंडू कणसे, रंगनाथ तांगडे, लता काळदाते, श्रावण शिंदे, रवि भदर्गे आदींची उपस्थिती होती.