गुरुगणेश महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:11 AM2020-01-25T01:11:33+5:302020-01-25T01:11:39+5:30
कर्नाटक गजकेसरी प.पू. गुरुगणेशलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कर्नाटक गजकेसरी प.पू. गुरुगणेशलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुगणेश महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांची उपस्थिती होती.
गुरूगणेशलाल महाराजांची येथील शिवाजी पुतळा परिसरातील जैन श्रावक संघाच्या परिसरात समाधीस्थळ आहे. गुरूगणेशलाल महाराजांची ५८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर प्रवचन तसेच गुरूगणेश महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवारी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच या परिसराच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. सकाळपासून समाधीस्थळाच्या दर्शनासाठी महिला व पुरूष भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जैन श्रावक संघाच्या सर्व संचालक मंडळाने येणा-या भाविकांची व्यवस्था केली होती.