चौकशी न करताच वर्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:09+5:302021-09-25T04:32:09+5:30
देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग शाळेत चौकशी न करता बंद करण्यात आला आहे. बंद केलेला ...
देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरू येथील आठवीचा वर्ग शाळेत चौकशी न करता बंद करण्यात आला आहे. बंद केलेला वर्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ चित्ते यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शासन मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवित असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे निमगाव गुरू येथील ८ वीचा वर्ग बंद करण्यात आला आहे. निमगाव गुरू येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेमध्ये एकूण १४७ विद्यार्थी असून, या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये एकूण १७ विद्यार्थी आहेत. यामध्ये ११ मुली आणि ६ मुले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मुली बाहेरगावी शिक्षणासाठी जात नाहीत. या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त असताना जिल्हा परिषद शालेय विभागाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ८ वीचा वर्ग बंद केला आहे. हा वर्ग बंद केल्यामुळे गावातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.
कोट
देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, टाकरखेड भागीले, देऊळगाव मही उर्दू शाळा या तीन शाळांची कोणतीही चौकशी केलेली नाही. केवळ निमगाव गुरू येथील ८ वीचा वर्ग बंद का करण्यात आला, हा प्रश्न आहे. मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा वर्ग पूर्ववत सुरू करावा.
- एकनाथ चित्ते, अध्यक्ष शालेय समिती