वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 06:59 PM2024-05-17T18:59:42+5:302024-05-17T19:00:12+5:30
शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे.
- शिवचरण वावळे
जालना : शासकीय कर्मचाऱ्यांना मनासारखे वेतन असताना देखील अनेक शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी लहान-मोठ्या कामासाठी सामान्य जनतेकडून १ हजार - पाचशे रुपये अशी चिरीमिरीची मागणी करतात. येथेच त्यांचा घात होतो. मागील सतरा महिन्यांत जालना जिल्ह्यातील वर्ग 'तीन'च्या ३१ कर्मचाऱ्यांना लाचेचा मोह आवरता आलेला नाही. ते एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत.त्या पाठोपाठ जिल्ह्यातील वर्ग दोन आणि वर्ग एकच्या अधिकारी यांचादेखील लाच स्वीकारण्यात समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने १ जानेवारी २०२३ ते १५ मे २०२४ या दरम्यान मृदा व जलसंधारण विभाग, पोलिस, महावितरण, महसूल, पंचायत समिती, वन विभाग, धर्मादाय,ग्रामविकास, जलसंपदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाजकल्याण, कृषी विभाग अशा विविध विभागांतील क्लासवन, क्लास २ अधिकारी आणि क्लास थ्री कर्मचारी यांच्यासह कंत्राटदार आणि खासगी व्यक्ती अशा विविध विभागांतील ५७ जणांविरोधात ३५ सापळे रचण्यात आले होते. या सापळ्यात दोन क्लास टू अधिकारी व ३१ क्लास थ्री कर्मचारी यांचा समावेश आहे. त्या नंतर चतुर्थ श्रेणीतील ८ व्यक्तींचा देखील लाच घेण्यात सहभाग असल्याने ते सापळ्यात अडकले आहेत. शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे.
खासगी व्यक्तीही ताब्यात
लाच घेणे आणि स्वीकारण्यामध्ये खासगी कंत्राटदार आणि खासगी व्यक्तींचा देखील यात समावेश असून, मागील दीड वर्षात खासगी कंत्राटदारांकडून पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास काम अडवून धरणे, शिवाय एखादे काम न करताच संबंधित कामाचे परस्पर बिल काढण्यासाठी लाचेचे प्रलोभन दाखवणे यासारख्या लोकांविरोधात देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून १४ जणांना जेरबंद करण्यात आले आहे.
लाच घेणे अन् देणे दोन्ही गुन्हा
कुठलाही वरिष्ठ अधिकारी थेट लाच स्वीकारण्याचे धाडस करत नाही किंवा त्याचा थेट कुणाशी संपर्क येत नाही. अशावेळी जे ग्राउंडवर काम करणारे कर्मचारी असतात ते अगदी जुजबी पैशाची मागणी करतात अन् सापळ्यात अडकतात. प्रत्यक्षात लाच घेणे आणि देणे गुन्हाच आहे. त्यामुळे चार दोन पैशांसाठी लाच घेणे टाळले पाहिजे.
- किरण बिडवे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, जालना