३० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:24 AM2020-02-17T00:24:26+5:302020-02-17T00:24:46+5:30
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ७३ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे.
परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थी ७३ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली असून,
१० केंद्र परिरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रोडरोमिओंचा त्रास टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे माहिती शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परीक्षेस जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवीचे ३७४ तर पाचवीचे ४५५ विद्यार्थी अनुपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षण विभागाच्यावतीने रविवारी आठवी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. आठवीच्या ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित होते. पाचवीच्या १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची परीक्षेस उपस्थिती होती. ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
राज्य शासनाच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. १०० केंद्रावर पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. पेपर -१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत घेण्यात आला. पेपर एकला १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला १०७८६ पैकी १०३१६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४७० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
७३ केंद्रावर आठवीची परीक्षा घेण्यात आली. पेपर १ ला ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थी उपस्थित होते. तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला ८३५२ पैकी ७९७६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ३७६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी उपस्थिती होती.