शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात घुसला कोब्रा: ग्रामस्थ शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:28 PM2022-11-09T18:28:07+5:302022-11-09T18:33:58+5:30

सर्पमित्र सतीश जंजाळ यांनी वर्गखोली उघडताच फरशीच्या एका फटीत हा कोब्रा नाग आढळून आला.

Cobra entered the classroom on the first day of school: Disaster was averted due to vigilance of village teachers | शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात घुसला कोब्रा: ग्रामस्थ शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात घुसला कोब्रा: ग्रामस्थ शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Next

टेंभुर्णी (जि. जालना) : दिवाळीच्या सुटीनंतर बुधवारी सर्वत्र शाळा उघडल्या. त्यात जाफराबाद तालुक्यातील नळविहरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत विषारी कोब्रा जातीचा साप गेल्याचे गावातील ग्रामस्थ सुनील मोरे यांना आढळून आले. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी सावध पवित्रा घेत सर्पमित्राला बोलावून सापाला बाहेर काढले. नागाला जेरबंद करताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

सर्पमित्र सतीश जंजाळ यांनी वर्गखोली उघडताच फरशीच्या एका फटीत हा कोब्रा नाग आढळून आला. त्याला पाहताच सर्वांच्या काळजात धस्स झाले. सर्पमित्र त्याला पकडण्यासाठी पुढे येताच सापाने फणा उगारला. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर जंजाळ यांनी सापाला भरणीत जेरबंद केले आणि गावाबाहेर दूर जंगलात नेऊन सोडून दिले. हा कोब्रा जातीचा विषारी नाग असल्याचे सर्पमित्र जंजाळ यांनी सांगितले. दरम्यान, जंगलात सोडण्यासाठी या नागाला जंजाळ यांनी बरणीच्या बाहेर काढताच तो काही वेळ सर्पमित्र जंजाळ यांच्यासमोर फणा काढून स्तब्ध उभा राहिला. आपल्याला जिवंत सोडल्याने तो सर्पमित्र सतीश जंजाळ यांच्याप्रती कृतज्ञाच व्यक्त करीत आहे, असे उपस्थितांना वाटले. सर्पमित्राच्या अगदी जवळ उभा हा नाग पाहून अनेकांनी काही वेळ आपले डोळे बंद करून घेतले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील गायकवाड, मुख्याध्यापक दत्तू मुनेमाणिक, प्रल्हाद गाडेकर आदींसह शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

वर्गखोलीत साप गेल्याची माहिती कळाल्यानंतर मी शाळेतील सर्व शिक्षकांना अवगत केले. सर्पमित्राला शाळेत बोलावून घेतले. कोणत्याही विद्यार्थ्यांना वर्गखोल्यात जावू दिले नाही. सर्पमित्र सतीश जंजाळ व ग्रामस्थांची मदत झाली. वर्गखोलीत साप गेल्याचे ग्रामस्थ सुनील मोरे यांनी  सांगितल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
- दत्तू मुनेमानिक, मुख्याध्यापक

Web Title: Cobra entered the classroom on the first day of school: Disaster was averted due to vigilance of village teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.