जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची मुंबईत बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:13 AM2018-04-17T01:13:37+5:302018-04-17T01:13:37+5:30
जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. सोमवारी या संदर्भातील आदेश प्राप्त झाले. त्यांच्या जागी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही.
साधारणत: दोन वर्षांपूर्वी शिवाजीराव जोंधळे जालना जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पीकविमा भरण्याबाबत व्यापक जनजागृती केली. याचा परिणाम म्हणून जालना जिल्हाने प्रधानमंत्री पीकविमा योजने देशात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल जोंधळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्याचबरोबर ड्रायपोर्ट, सीड्सपार्क, आयसीटी या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या कामात त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगली कामगिरी केली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शेगाव-पंढरपूर दिंडी मार्ग या रस्त्याच्या भूसंपादनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.