सोशल मीडियातून भरले जाताहेत जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:36 AM2018-03-15T00:36:39+5:302018-03-15T00:36:44+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सोशल मीडियातून राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियातील अॅप्सच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची वातावरण निर्मिती केली जात आहे. यातून निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा आणि विधानसभेचा कालवधी संपण्यास एक कालावधी असला तरी राजकीय अस्थिरतेमुळे केव्हाही निवडणुक होऊ शकतात, हे चित्र आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी आणि पक्षाच्या शक्तीचा अंदाज घेतला जात आहे. पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडिया २०१४ च्या निवडणुकांपासून अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. किंबहुना सोशल मीडियामुळे अनेक उमेदवारांचा विजय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. म्हणूनच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवर नेहमी चर्चेत राहण्यासह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचे कसब या नेत्यांनी प्राप्त केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. मतदार संघात संभाव्य उमेदवार आणि नेत्यांचे दौरे आणि मतदारांशी सुरु झालेला संवाद यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. फेसबुकच्या माध्यमातून एका अॅप्सद्वारे जिल्ह्यातील नेत्यांना प्रोजेक्ट केले जात आहे.
फेसबुक असणाऱ्यांना विविध प्रश्नांद्वारे नेत्यांच्या लोकप्रियतेची चाचपणी आणि मतदारांचा कल आतापासूनच घेतला जात आहे. जिल्ह्यातील कोणता राजकीय नेता तुम्हाला राजकारणात वाव देऊ शकतो, तुमचे विचार कोणत्या पक्षाशी मिळतेजुळते आहेत, अशा प्रश्नांद्वारे राजकीय वातावरण तापविले जात आहे.
नेत्यांचे होतेय प्रोजेक्शन..
विधानसभा मतदार संघनिहाय सोशल मीडियातील विविध अॅप्सद्वारे मतदारांना आकर्षित करुन चर्चा घडवून आणली जात आहे. यातूनच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रोजेक्शन केले जात असल्याचे दिसते. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व पाहता राजकीय नेते या माध्यमाकडे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसते. संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारास शह देण्यासाठी या सोशल मीडियातून प्रयत्न केला जात आहे.