्रजालना येथे कोम्बिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:01 AM2018-09-18T01:01:04+5:302018-09-18T01:01:19+5:30
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोमवारी सायंकाळी जालना पोलिसांच्या वतीने कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. यात ८ तलवारी, २ गुप्ती, १ कत्ती, १ कोयता व १० किलो चंदन जप्त करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोमवारी सायंकाळी जालना पोलिसांच्या वतीने कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. यात ८ तलवारी, २ गुप्ती, १ कत्ती, १ कोयता व १० किलो चंदन जप्त करण्यात आले असून, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी दिली.
जिल्हाभरात दरोडा, चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एडीएस दलाच्या वतीने शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. जुना जालन्यातील कैकाडी मोहल्ला येथील सर्जा पवार, राहुल पवार, सुभाष पवार, महावीर, सुभाष ढक्का, जावेद, महंमद कुरेशी यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. यातील सुभाष पवार यांच्या घरातून ३ तलवारी व १ गुप्ती मिळून आली. त्यानंतर मंगळवार बाजार परिसरातील दिनेश भगत यांच्या घरातून ३ तलवारी, नरेन भगत यांच्या घरातून १ तलवार, कैलास मेघावाले यांच्या घरातून १ तलवार व १ गुप्ती जप्त करण्यात आली. गांधी चमन परिसरातील बाबू पवार यांच्या घरातून १० किलो चंदनाची लाकडे मिळून आली आहे. तसेच पोलीस गल्ली येथील सरफराज खान यांच्या घरातून १ कत्ती व १ कोयता जप्त करण्यात आला आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोनि. शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पोनि. साईनाथ ठोंबरे, पोनि. बाळासाहेब पवार, महादेव राऊत, पोनि. किशोर बोंर्डे यांच्यासह पथकातील दुय्यम अधिकारी व १५० पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
या ठिकाणी झाली कारवाई
शहरातील कैकाडी मोहल्ला, रेहमान गंज, गांधी चमन, मंगळबाजार, गांधीनगर यासह आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
कारवाईने उडाली खळबळ
अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल व शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास छापा सत्र सुरु करण्यात आले. यात जवळपास १७५ अधिकारी व कर्मचारी असल्याने या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली.