दिलासादायक ! मराठवाड्यात ६० हजार २६९ मजुरांना मिळाले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 04:36 PM2020-05-18T16:36:57+5:302020-05-18T16:39:53+5:30
कोरोना विषाणूचे थैमान आणि लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.
- दीपक ढोले
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकारीची कुºहाड आलेल्या मजुरांना दिलासा मिळाला असून, मराठवाड्यात मग्रारोहयोंतर्गत मराठवाड्यातील ६० हजार २६९ जणांच्या हाताला काम मिळाले आहे. यात जालना जिल्हा संख्येच्या दृष्टीने अव्वल असून येथील १२ हजार ३४१ मजुरांना काम मिळाले आहे. तर दुसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा असून, तेथील ५३0 ग्रामपंचायतीत सुरु झालेल्या १0४९ कामावर १0 हजार १८0 जण काम करीत आहेत.
कोरोना विषाणूचे थैमान आणि लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेक मजूर आपल्या गावी अथवा राज्यात परतले होते आणि शासनाने मग्रारोहयोंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रारंभी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याविषयी गावपातळीवर ग्रामस्थांनी आंदोलने करून ग्रामपंचायतीकडे काम देण्याची मागणी केली. त्यानंतर झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानुसार प्रशासनाने योग्य नियोजन करून ३३५ ग्रामपंचायतीमध्ये ९८४ कामे सुरू केली. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थित आहे.
मजुरांना मागणीप्रमाणे काम मिळेल
मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतस्तरावर कामे उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि सीईओ निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कामे उपलब्ध करून देण्यात आली. मराठवाड्यात मग्रारोहयोच्या कामावर जालना जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थित आहेत. या पुढेही मजुरांना मागणीप्रमाणे काम उपलब्ध करून दिले जाईल.
- संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि. प. जालना
मराठवाड्यात मजुरांची जिल्हानिहाय उपस्थिती
जिल्हा मजूर
जालना १२३४१
औरंगाबाद ६६९९
परभणी ६१४४
नांदेड ७८२८
हिंगोली ७०४५
बीड ३३३२
लातूर ६७००
उस्मानाबाद १०१८०