अस्वच्छतेची तक्रार आता आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:15 AM2017-12-09T00:15:01+5:302017-12-09T00:15:40+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत थेट आॅनलाइन तक्रार दाखल करता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता एम.ओ. एच. यु.ए.’ हे अँड्राईड अॅप विकसित केले आहे.
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत थेट आॅनलाइन तक्रार दाखल करता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता एम.ओ. एच. यु.ए.’ हे अँड्राईड अॅप विकसित केले आहे. जालनेकरांना प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करून आपल्या प्रभागातील स्वच्छतेबाबतच्या तक्रारी आॅनलाइन दाखल कराव्यात, अशी माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
स्वच्छता अॅप व नगरपालिकेच्या स्वच्छतेबाबतच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी माहिती देण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांची उपस्थिती होती.
जालना शहराला १३ हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट होते, पैकी सात हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्वच्छतेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी २०० पेक्षा अधिक अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, जिल्हाधिका-यांनी यास परवानगी दिली आहे. मार्चअखेर प्रलंबित घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच शहरातील ओला, सुका व प्लॅस्टिक कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी येणाºया काळात नियोजन केले जाणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. तर स्वच्छ सर्वेक्षणात जालना शहर ३३७ क्रमांकावर असून, स्वच्छतेबाबत नागरिकांचा आॅनलाइन प्रतिसाद मिळविण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या अॅपच्या माध्यमातून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल व उपनगराध्यक्ष राऊत यांनी केले. या वेळी सभापती स्वच्छता विभाग प्रमुख माधव जामधडे, गणेश राऊत, नजीब लोहार, सॅमसन कसबे आदींची उपस्थिती होती.
------------
असे होईल तक्रारीचे निवारण
आपल्या प्रभागातील स्वच्छताबाबतच्या तक्रारीसाठी नागरिकांना प्ले स्टोअरमधून ‘स्वच्छता एम.ओ. एच. यु.ए.’ हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपमध्ये मराठी, हिंदी इंग्रजीसह अन्य भाषा आहेत. एकदा अॅप डाऊनलोड झाल्यानंतर नागरिकांना प्रभातील अस्वच्छ ठिकाण, जनावरांनी केलेली अस्वच्छता, मेलेली जनावरे याबाबत त्या ठिकाणाचा फोटो घेऊन त्याबाबतच्या माहितीसह आॅनलाइन तक्रार दाखल करता येईल. हे करताना तक्रारकर्त्याला त्याचे जीपीआयए लोकेशन सुरू ठेवावे लागणार आहे. प्राप्त तक्रारीचे निराकारण करण्यासाठी नगरपालिकेने एक स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकाला संबंधित ठिकाणांची स्वच्छता करून चोवीस तासांत छायाचित्रासह तक्रार सोडविल्याचे अॅपद्वारे आॅनलाइन अपडेट करावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अॅप डाऊनलोड केल्यास शहराच्या गुणांच्या स्वच्छता मानांकनात वाढ होणार आहे. त्यामुळे याबाबत पालिका आग्रही आहे.