विमा कंपनीविरोधात तक्रारींचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:03 AM2018-07-19T01:03:44+5:302018-07-19T01:04:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.
दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी पीकविमा भरल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला होता. त्यासाठी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांच्यासह मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाने देखील मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी मात्र पीकविमा भरताना अनेक तांत्रिक चुका राहिल्याने शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी ओरिएंटल विमा कंपनी तसेच अन्य एक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून शेतक-यांच्या तक्रारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातून शेतक-यांनी गर्दी केली होती.
कंपनीने तातडीने दोष दूर करून मदत द्यावी
पीकविमा भरण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. अनेकवेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही विमा कंपनी तसेच बँकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहत आहे. याकडे पुढील वर्षी विमा भरण्याच्या पध्दतीत सुधारणा करून सर्व व्यवहार हे मराठीतून केल्यास शेतक-यांना नेमके काय सुरू आहे, याची कल्पना येणार आहे. अनेकवेळा आॅनलाइन विमा भरताना सर्व्हर डाऊन होण्यामुळे देखील तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत.