जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:15 AM2020-01-30T01:15:57+5:302020-01-30T01:16:40+5:30
केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जालना शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जालना शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठेसह इतर काही भागांतील व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. तर काही भागातील दुकानांमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
जाफराबाद शहरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवित दुकाने बंद ठेवली होती. बहुजन क्रांती मोर्चा व मुस्लिम बांधवांच्या वतीने बुधवारी सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी युवकांनी विविध घोषणा दिल्या. ही रॅली तहसील कार्यालयावर नेण्यात आली. रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामधन कळंबे, दीपक बोराडे, नसिरखाँ पठाण, अनिल बोर्डे, रविराज जैस्वाल, सचिन गौतम, महेबूब पठाण, दामू वैद्य, शेख दाऊद, राजेश वाघ, हाफिज अब्दुर्रहेमान, हाफिज अजगर, हाफिज अलिमोद्दिन आदी उपस्थित होते. अस्लम पठाण यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. तर हाफिज फारुक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील एकता मंचतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी निषेध रॅली काढण्यात आली. यात बहुजन विकास आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रामधन कळंबे, भारिपचे भाऊसाहेब शेजवळ यांनी मनोगत व्यक्त करीत केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. सूत्रसंचालन एकता मंचचे एजाज शहा यांनी केले.
परतूर तालुक्यातील आष्टी येथेही बंद पाळण्यात आला. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली होती. यात विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी आष्टी ठाण्याचे सपोनि सुभाष. सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील व्यापा-यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. युवकांनी विविध फलक घेऊन रॅली काढली. बसस्थानकासमोर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. उपस्थितांनी केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. दुपारनंतर व्यवहार सुरळीत झाले होते.
भोकरदनमध्ये दुपारपर्यंत बंद
भोकरदन : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्या विरोधात एकता मंच तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहरातील लहान मोठ्या व्यापा-यांनी सहभाग नोंदविला. मोर्चानंतर दुपारी व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी युवकांनी विविध घोषणा देत शासन धोरणांचा निषेध नोंदविला. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात विविध संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग नोंदविला होता.
मंठा येथेही निषेध
मंठा : एनआरसी, सीएए विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मंठा बंदला प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. मंठा टी पॉइंटवरून निघालेला मोर्चा विविध मार्गावरून काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी शासन धोरणाचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले.
परतूरमध्येही बंद; मोर्चा
परतूर : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला परतूर शहरातही प्रतिसाद मिळाला. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तहसील गेटसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी काही काळ वाहतूक वळविण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर, पोनि शिरीष हुंबे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गेल्या महिनाभरापासून एनआरसी आणि सीएए या कायद्याविरोधात जिल्हाभरात मोठा असंतोष पसरला असल्याचे दिसून येत आहे.