जालन्यात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:55 AM2020-01-08T00:55:04+5:302020-01-08T00:56:16+5:30
जालन्यात मंगळवारी प्लास्टिकमुक्त जालना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. सकाळी गांधी चमन भागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार मराठवाड्यात प्लास्टिक मुक्तीची चळवळ अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात मंगळवारी प्लास्टिकमुक्त जालना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला.
सकाळी गांधी चमन भागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर,
स्वच्छता सभापती सोनाली चौधरी, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, अति. मुख्याधिकारी केशव कानपुडे, उपमुख्याधिकारी शिंदे, वाटोरे, स्वच्छता विभागाचे शहर अभियंता संजय वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भल्या सकाळी रस्त्यावरील कडेला पडलेले प्लास्टिक गोळा करून नागरिकांनाही या मोहिमेत सहभागाचे आवाहन केले.
शहराच्या प्रत्येक प्रभागात अशी प्लास्टिकमुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी विविध स्वयंसेवी संस्थाही यासाठी मदत करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
दरम्यान सकाळी या मोहिमेत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रॅली काढून जागृती केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक खर्डेकर, पंडित पवार, सॅमसन कसबे, लोंढे, गावंडे, आबा पाटील, संदीप वानखेडे, नीलेश शंकर पेल्ली यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. ही मोहीम आता नियमितपणे चालणार असल्याचे सांगण्यात आले.