परतूर तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:06+5:302020-12-31T04:30:06+5:30
नवीन ऊस लागवड वाढली : यंदा ऊसाच्या उत्पादनात वाढ परतूर : तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता वाढल्याने शहराजवळील बागेश्वरी ...
नवीन ऊस लागवड वाढली : यंदा ऊसाच्या उत्पादनात वाढ
परतूर : तालुक्यात अतिरिक्त ऊसाची चिंता वाढल्याने शहराजवळील बागेश्वरी साखर कारखाना मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
परतूर तालुका व परिसरात मागील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होत आहे. गेल्यावर्षी ऊस नसल्याने लवकर बंद करावा लागणाऱ्या बागेश्वरी साखर कारखान्याचे प्रशासन यावर्षी अतिरिक्त ऊसामुळे चिंतेत पडले आहे. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची लागवड वाढली आहे. परवानगीशिवाय तसेच कारखान्याकडे रितसर नोंद केल्यानंतरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाने करूनही असंख्य शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस सोडून सध्या कारखाना कार्यक्षेत्रातच जवळपास ८ हजार हेक्टरवर ऊस आहे. बागेश्वरी कारखान्याची दररोज मूळ गाळप क्षमता २,५०० मेट्रिक टन होती, ती आता तीन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी कारखाना दररोज ३,३०० मेट्रिक टन गाळप करत आहे. मागील वर्षी ज्या कारखान्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस नेला होता, ते कारखानेही यावर्षी ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्याही ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बागेश्वरीला अडचणीत व नियमीत ऊस दिला, त्या शेतकऱ्यांना कारखाना प्राधान्य देणार आहे. गतवर्षी हेक्टरी ८० टनाचे उत्पन्न ऊस उत्पादकांना मिळाले होते, ते यावर्षी १०० टन मिळत असल्याने हा भारही कारखान्यावर वाढला आहे. एकूणच ऊसाचे वाढते क्षेत्र ही आता कारखान्याबरोबरच ऊस उत्पादकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. आजवर मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याने १ लाख ९० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. दिनांक ३० डिसेंबरपासून ऊसाचा पहिला हप्ता २ हजार रूपये टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. यावेळी सभापती कपिल आकात, सुधाकर कदम आदी उपस्थित होते.
चोकट
ऊस उभा राहणे चांगली बाब नाही - जाधव
मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, गाळपाअभावी शेतकऱ्यांचा ऊस उभा राहणे ही चांगली बाब नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून लागवड केलेला ऊस गेला नाही तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील. आम्ही कारखाना सुरळीत व शिस्तीत चालवत आहोत. आम्हाला कोणाचा ऊस न्यायचा नाही, असा विषय नाही, मात्र, कारखान्याची गाळप क्षमता वाढवूनही वाढलेल्या ऊसाचा भार झेपत नाही. मागील वर्षीचाच ऊस भरपूर आहे. यावर्षी पुन्हा लागवड वाढली आहे. त्यातच यंदा ऊसाच्या उत्पानातही वाढ झाली आहे. त्यामुळे कारखान्याने गाळप क्षमता वाढवून सुरळीत चालवूनही सर्व ऊसाचे गाळप होईल की नाही, याची शाश्वती नाही. कारखाना मे महिन्याअखेर चालेल पण पुढे टोळ्यांच्या अडचणी येतात. सर्व शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कारखान्याची क्षमता व वाढलेले ऊसाचे क्षेत्र यामुळे अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही जाधव यांनी सांगितले.