आत्मविश्वास हेच महिला, मुलींचे खरे अस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:44 AM2019-12-20T00:44:36+5:302019-12-20T00:45:12+5:30
आपल्यातील आत्मविश्वास, हिंमत हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अत्याचार, छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला, मुलींनीच आता ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आपल्यातील आत्मविश्वास, हिंमत हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी केले.
अंबड शहरातील मत्स्योदरी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी दामिनी पथकाच्या वतीने शालेय, महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उपप्राचार्य ज्ञानेश्वर वाघुंडे, पी.टी. काळे, बी.बी. लहाने, डी.डी. भुतेकर, कोठावळे, एस.जी. पालकर, जानकी देशपांडे, ए.डी. निंबाळकर यांची उपस्थिती होती. जाधव म्हणाल्या, हैदराबाद येथील प्रकरण ताजे आहे. यापूर्वी देखील उन्नाव, दिल्लीतील निर्भया, कोपर्डी यासारख्या घटनांनी देश उद्विग्न झालेला आहे. अशा घटना रोखायच्या असतील तर सर्वात आधी मुली, महिलांनी खंबीर व्हायला हवे. स्वत: वरील आत्मविश्वास आणि हिंमत जागी केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. जाधव यांनी मुलींना स्वसंरक्षणासह इतर कायद्यांबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्वसंरक्षण कार्यशाळेत कुडो सेल्फ डिफेन्स ट्रेनर दत्ता पवार, सुमित भवर, गौरव आजगे, राजवीर चौधरी, राजकुमार वाघ यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. मुलींनीही या प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.
कार्यशाळेत जवळपास चार हजार मुलींनी सहभाग नोंदविला. यावेळी दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी एस.एम. राठोड, ए.डी. साबळे, आर.एल. राठोड, यू.पी. साबळे, व्ही.एस. तायडे यांची उपस्थिती होती.